मुंबई | स्टार न्यूज़ टुडे | मोहम्मद मुकीम शेख
दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा सण. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद,उत्साह,समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा शुभेच्छा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी समस्त मुंबईकर नागरिकांना दिल्या आहेत.
दीपावली उत्सवाचे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्यावतीने आज बुधवार, दिनांक ०३ नोव्हेंबर २०२१ रोजी पेंग्विन इमारत, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग), भायखळा (पूर्व) येथे स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.
याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, खासदार श्री.अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते श्री.रवी राजा, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते श्रीमती राखी जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी, नगरसेवक, नगरसेविका महापालिका सहआयुक्त, उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्त तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करून साजरी करायची आहे. यावर्षी *" माझी वसुंधरा"* अभियानातून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावयाची असून फटाक्यामुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. यावर्षीची दिवाळी आपण प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी करूया,असे आवाहनही महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकर नागरिकांना केले आहे.
नागरिकांनी मुखपट्टी लावूनच घराबाहेर पडावे, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.
खासदार श्री. अरविंद सावंत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचे आमच्यावर संस्कार असल्यामुळे आमचा प्रत्येक नगरसेवक हा समाजसेवेत अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व लोकप्रतिनिधींनी मुंबई विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना तसेच नियोजन करताना दक्ष असावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.