मुंबई | स्टार न्यूज़ टुडे | विशेष संवाददाता
*हुतात्मा चौक, काळाघोडा चौक,राम्पार्ट पदपथ या ३ ठिकाणी सशुल्क वाहनतळांवर उपलब्ध होणार सुविधा*
*सुरुवातीच्या ३ महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग सुविधा*
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या हद्दीतील हुतात्मा चौक, काळाघोडा चौक आणि राम्पार्ट पदपथ या ३ ठिकाणी नियोजित इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचे भूमिपूजन राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज (दिनांक २ नोव्हेंबर २०२१) हुतात्मा चौकात छोटेखानी समारंभात करण्यात आले.
याप्रसंगी स्थानिक नगरसेविका श्रीमती सुजाता सानप, उप आयुक्त (परिमंडळ १) श्री. विजय बालमवार, ए विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती चंदा जाधव आणि इतर मान्यवर उपास्थित होते.
ए विभागाच्या हद्दीतील मुंबई उच्च न्यायालय, हॉर्निमन सर्कल यासह इतरही महत्त्वाच्या परिसरांमध्ये स्थित सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी अशाप्रकारची चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची सूचना मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने विजेवर भारीत होऊन (इलेक्ट्रिक चार्जिंग) धावणाऱया वाहनांच्या धोरणाला पाठबळ देण्यात आले आहे. या धोरण अंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱया पायाभूत सुविधा यांनादेखील प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात देखील इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीला महानगरपालिकेच्या वतीने प्राधान्य देण्यात येत आहे. जेणेकरुन, अधिकाधिक नागरिक विद्युत वाहने वापरात आणू शकतील.
महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयाच्या वतीने एकूण ३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यामध्ये हुतात्मा चौक सशुल्क वाहनतळ, काळाघोडा चौकातील सशुल्क वाहनतळ आणि राम्पार्ट मार्ग पदपथ सशुल्क वाहनतळ या ३ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या तीनही ठिकाणी सुरुवातीच्या पहिल्या ३ महिन्यांसाठी विनामूल्य इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगची सुविधा उपलब्ध असेल.
या तीनही ठिकाणी प्रत्येकी ३ चार्जिंग पॉईट असतील. तसेच प्रत्येक चार्जिंग पॉईट ७.४ किलोव्हॅट एसी चार्जिंग क्षमतेचा असेल. त्यासाठी सिंगल फेज विद्युतपुरवठा केला जाईल. सिंगल फेज विद्युतपुरवठा असल्याकारणाने छोट्या जागेत आणि लहान आकारात हे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन बांधणे शक्य होणार आहे. तसेच वाहने चार्जिंग करताना सुरक्षितरित्या चार्ज होऊ शकतील. त्यासोबत या चार्जिंग स्टेशन्सची देखभाल करणे देखील तुलनेने सोपे असते.