मुंबई | स्टार न्यूज़ टुडे | विशेष संवाददाता
"वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया" यांच्यातर्फे आज जो सत्कार करण्यात आला हा सत्कार माझा एकटीचा नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे सूचनापर मार्गदर्शन व कोरोना काळात डॉक्टर,परिचारिका, वॉर्डबॉय यांनी जीव धोक्यात घालून केलेले काम तसेच या कामाला मुंबईकर नागरिकांनी दिलेली साथ या सर्वांचा हा सन्मान असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी केले.
कोरोना काळात महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन "वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया" यांच्यातर्फे आज दि. १२ नोव्हेंबर २०२० रोजी, भायखळा येथील महापौर निवासस्थानी छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता,त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या.
याप्रसंगी माजी महापौर तथा नगरसेविका स्नेहल आंबेकर, "वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया" संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवन सोलंकी, संजय नार्वेकर, सुषमा तांबोडकर उपस्थित होत्या.
महापौर किशोरी पेडणेकर पुढे बोलताना म्हणाल्या की, आज माझ्या भाग्याचा दिवस असून सदर संस्थेने माझ्या कार्याची दखल घेऊन माझा सन्मान केला त्याबद्दल सदर संस्थेचे मनापासून आभार मानत असल्याचे महापौर म्हणाल्या. कोरोनाच्या संकटकाळात महापौर म्हणून मला महापालिकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्यामुळे पुरस्कारासाठी पात्र ठरली असल्याचे महापौर म्हणाल्या. मुंबईकर नागरिकांनी नियम पाळले, स्वतःला सुरक्षित केले तसेच "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले, त्यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी करण्यामध्ये महापालिका यशस्वी झाली असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच माजी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची कामगिरी, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीसुद्धा संपूर्ण धारावी परिसर पिंजून काढला त्यामुळे कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे शक्य झाले असल्याचे महापौरांनी सांगितले.
माजी महापौर स्नेहल आंबेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,कोरोना काळात महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्कृष्ट कार्य करून मुंबईचे नाव उज्वल केले आहे.या कार्याची दखल घेऊन गुजरातमधील संस्था महापौरांचा सत्कार करत आहे हा खूप मोठा बहुमान आहे. याबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांचे अभिनंदन करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
"वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया" या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पवन सोलंकी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कोरोना काळामध्ये घराबाहेर पडताना नागरिक जेव्हा घाबरत असताना महापौर स्वतः रुग्णालयात जाऊन परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा केली. महापौरांनी केलेल्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन महापौरांचा सन्मान करण्याचा आमच्या संस्थेने निश्चय केला व आज हा दुग्धशर्करा योग घडून आल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी, "वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया"या संस्थेतर्फे महापौरांना रेकॉर्ड प्रमाणपत्र, प्रशस्तीपत्र तसेच शाल व फेटा देऊन सत्कार करण्यात आला.